fbpx
Master Courses • Pure Learning

मराठी की इंग्लिश? गुगलचं काय म्हणणे आहे?

‘इंग्रजी की मराठी? हा चर्चासत्रे, वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन, सोशल मीडिया, कट्ट्यावरच्या गप्पा, महिला मंडळे यांत हमखास रंगणारा विषय. ‘इंग्रजी की मराठी? या प्रश्नाचे उत्तर शोधताना ही किंवा ती बाजू लढवणाऱ्यांचे आपापले भक्कम तर्क असतात. मात्र महाराष्ट्रात इंटरनेटवर राज्य करणारी भाषा कोणती? महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी संपर्कमाध्यम म्हणून कोणती भाषा वापरावी? इंग्रजी की मराठी? असा  प्रश्न जर तुम्ही गुगलला विचाराल तर गुगलकडून निसंदिग्ध उत्तर मिळेल ‘मराठी’. गुगल असे का म्हणतो हे जाणून घेण्यापूर्वी आमच्याच बाबतीत घडलेला एक प्रसंग सांगतो.

‘स्वयम् लर्न’ ची वेबसाईट तयार करण्याच्या दिशेने जुळवाजुळव करत असताना ही वेबसाईट मराठीमध्ये असणार हे आधीच पक्के केलेले होते. कारण आपले सर्व लर्निंग प्रोग्राम मराठी आहेत, स्वयम् लर्नचे ग्राहक हे मराठीच असणार आहेत त्यांच्याशी फोनवर बोलताना किंवा प्रत्यक्ष भेटीत संवाद मराठीतच होणार आहे तर मग वेबसाईटही मराठी मध्येच असणार हा विचार या मागे होता.

वेबसाईट प्रकाशित झाली आणि जवळच्या लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी मराठी बेवसाईट असण्याचे कौतुक केले मात्र बहुसंख्य जणांनी आमच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या म्हणण्यानुसार बिझनेस वेबसाईट ही इंग्लिश मध्ये असायला हवी कारण तसा ‘ट्रेंडच’ आहे. त्यांनी त्यांच्या या तर्काच्या आधारासाठी मराठी जनमानसात स्थान मिळवलेल्या मराठी उद्योगांच्या वेबसाईट दाखवल्या. आणि खरेच, ज्यांचे बहुसंख्य ग्राहक मराठी बोलणारेच आहेत आणि ज्यांची उत्पादने मराठी माणसांच्या घराघरात, अगदी पोटात सुद्धा विराजमान झालेली आहेत अशा मराठी उद्योगांच्या वेबसाईट फक्त इंग्रजी मध्येच होत्या. काही मराठी साहित्य प्रकाशकांच्या वेबसाईटसुद्धा इंग्रजीतच असलेल्या पाहून आश्चर्याचा जोरदार धक्का बसला. हे पाहून मराठी वेबसाईट तयार करून आपले काही चुकले तर नाही ना? असे आम्हालाही असे वाटू लागले.

मात्र ज्यांच्यासाठी ही वेबसाईट केली आहे त्यांच्या, म्हणजे प्रत्यक्ष स्वयम् लर्न ग्राहकांच्या या वेबसाईट विषयीच्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक होत्या. या प्रतिक्रिया पाहून आपण योग्य निर्णय घेतला आहे हे लवकरच पटले. वेबसाईटच्या माध्यमातून आम्हाला जे काही सांगायचे होते ते पुणे मुंबई ते अगदी मौजे खुर्द- बुद्रुक इथल्या मराठी बंधू भगिनींपर्यंत शब्द न शब्द पोचतो आहे हे पाहून आम्हालाही आनंद वाटला. मात्र ज्यांचे बहुसंख्य ग्राहक मराठीच आहेत अशा महाराष्ट्रातील व्यवसायांच्या वेबसाईट इंग्रजीमध्येच करण्यामागे काय विचार असेल हा प्रश्नही अनुत्तरीतच राहिला.

या दरम्यान गुगल आणि केपीएमजी यांनी एप्रिल २०१७ मध्ये प्रकाशित केलेला एक अहवाल वाचला आणि मराठी वेबसाईटविषयी आमच्या निर्णयाला पुष्टी मिळाली. जगभरच्या उद्योगांना सल्ला देणाऱ्या केपीएमजी या दिग्गज बहुराष्ट्रीय कन्सल्टन्सी कंपनीने गुगल सोबत २०१६ साली एक अभ्यास केला. या अभ्यासाचा विषय होता ‘भारतीयांचा इंटरनेटवरील भाषाव्यवहार आणि इंटरनेटयुगात भारतीय भाषांचे भवितव्य’. या अभ्यासातून निघालेले निष्कर्ष आणि त्याच्या आधारे गुगल आणि केपीएमजीने निर्देशित केलेली भविष्याची दिशा अत्यंत विस्मयकारक आणि भारतीय भाषाप्रेमींसाठी उत्साहवर्धक आहे. केपीएमजी आणि गुगल यांच्या मते प्रथमच इंटरनेट वापरण्यास सुरुवात करणारे नव्वद टक्के भारतीय त्यांच्या मातृभाषेला प्रथम प्राधान्य देतात. स्वतःच्या भाषेतल्या वेबसाईट आणि त्यावरील मजकूर त्यांना अधिक जवळचा आणि विश्वासार्ह वाटतो. भारतीयांच्या इंटरनेटवर असलेला इंग्रजीचा वरचष्मा लक्षणीय वेगाने कमी होत आहे. इंटरनेट वर भारतीय भाषांमध्ये व्यवहार करण्याचे प्रमाण दरवर्षी १८ टक्के गतीने वाढत आहे. २०२१ सालापर्यंत भारतीय भाषांमधील इंटरनेटचा एकूण वापर तब्बल ७५ टक्के होईल.

गुगलच्या दक्षिणपूर्व आशिया आणि भारतीय विभागाचे प्रमुख रंजन आनंदन म्हणतात की “भारतीय इंटरनेट वरील इंग्रजीचा प्रभाव संपुष्टात आला आहे. भारतात केवळ वीस कोटी लोक इंग्रजी लिहू, वाचू शकतात. हे वीस कोटी लोक आधीपासूनच इंटरनेट वर आहेत. नवीनच इंटरनेट वापरायला सुरु करणाऱ्यांपैकी ९० टक्के लोक त्यांच्या भाषेतील ऑनलाईन कॉन्टेन्ट वाचायला पहिली पसंती देतात” आज आपण फेसबुक आणि व्हाट्सअप वर होणारी संदेशांची देवाणघेवाण पाहिली तर रंजन आनंदन यांच्या या विधानाचा प्रत्यय येईल. मागील काही वर्षात स्मार्ट फोन्सच्या कमी होत असलेल्या किमती, भारतीय भाषांसाठी खास डिझाईन केलेली त्यातील फिचर्स आणि पूर्वीच्या तुलनेने अतिशय स्वस्त दरात उपलब्ध झालेली इंटरनेट सेवा यामुळे समाजातल्या सर्वात खालच्या स्तरापर्यंत इंटरनेटने शिरकाव केला आहे. स्वतःचे विचार व्यक्त करण्यासाठी आज प्रत्येकाला सोशल मीडियाचे व्यासपीठ मिळाले आहे. आजवर दुसऱ्यांनी लिहिलेले फक्त वाचणारे आता लिहिते झाले आहेत. याचा परिणाम म्हणून की काय लोकांच्या स्वभाषेविषयी असलेली अस्मितासुद्धा यामुळे पुन्हा जागी झाली आहे. त्यामुळे साहजिकच इंटरनेटवर स्वतःच्या भाषेत लिहायला आणि वाचायला लोक पहिली पसंती देत आहेत.

गुगल आणि केपीएमजी यांच्या या अभ्यासात मराठी भाषेविषयी नोंदवलेली निरीक्षणे सुद्धा अतिशय उद्बोधक आहेत. भारतात इंटरनेटवर हिंदी वापरणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बंगाली भाषा आहे तर तिसऱ्या क्रमांकावर मराठी आहे. एकूण भारतीय इंटरनेट विश्वात मराठी भाषा वापरण्याचे प्रमाण नऊ टक्के इतके आहे. चौथ्या क्रमांकावर तेलगु आहे. भारतामध्ये व्यवसाय वाढीसाठी हिंदी, बंगाली, मराठी आणि तेलगू या भाषा सर्वाधिक महत्वाच्या आहेत. या चार भाषांचा इंटरनेट वरील एकूण हिस्सा हा तब्बल सत्तर टक्के आहे. इंटरनेट वरील व्यवहारांसाठी मराठी भाषा स्वीकारण्याचे प्रमाण ४४ टक्के गतीने वाढत आहे. याचा अर्थ असा की दरवर्षी मराठी भाषेतील वेबसाईटस, ब्लॉग्ज, व्हिडीओज, ऑनलाईन जाहिराती यांचे प्रमाण ४४ टक्के गतीने वाढत आहे.

गुगल आणि केपीएमजी यांच्या या अहवालातील प्रमुख मुद्दे या प्रमाणे आहेत. यांचा विचार व्यवसायासाठी भाषेचे माध्यम निवडताना प्रत्येक व्यावसायिकाने करायला हवा.

♦ भारतीय भाषांमध्ये इंटरनेट वापरणारे ९९ टक्के युजर्स हे मोबाईल फोन वरून इंटरनेट वापरतात. त्यामुळे वेबसाईट किंवा कोणताही ऑनलाईन कॉन्टेन्ट तयार करताना मोबाईल फर्स्ट हा विचार करून त्याची रचना करायला हवी.  

♦ ग्रामीण भागात राहणारे भारतीय आठवड्याला ५३० मिनिटे इंटरनेट वापरतात.

♦ शहरी भागातील भारतीय आठवड्याला ४८७ मिनिटे इंटरनेट वापरतात.

♦ इंग्रजीच्या तुलनेत मातृभाषेतील ऑनलाईन जाहिरातींना मिळणार प्रतिसाद हा ८८ टक्के अधिक आहे. यामुळे कोणतेही ऑनलाईन बिझनेस प्रमोशन करताना स्थानिक भाषेला डावलून चालणार नाही.   

♦ २०२१ सालापर्यंत ऑनलाईन माध्यमांतून बातम्या वाचणारे एकूण ८० टक्के वाचक हे हिंदी, मराठी, बंगाली आणि तामिळ भाषिक असतील.

♦ मातृभाषेतील कॉन्टेन्ट वाचण्याची भारतीयांची भूक मोठी आहे, सध्या उपलब्ध असलेला ऑनलाईन कॉन्टेन्ट त्यासाठी पुरेसा नाही.

शिक्षणासाठी ‘मराठी की इंग्रजी’ यापैकी कशाची निवड आपण करायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा आहे, मात्र इंटरनेट विश्वात मराठीचा आणि एकुणातच भारतीय भाषांचा टक्का झपाट्याने वाढत आहे हे निश्चित. येत्या काही वर्षात भारतीय इंटरनेटचे अवकाश स्थानिक भाषांनी व्यापलेले असेल हेच गुगल आणि केपीएमजीच्या या अहवालाचे सार आहे. या सगळ्या माहितीचा एका व्यावसायिकांसाठी असलेला अर्थ सरळ आहे, जर एखाद्याला इंटरनेटचा वापर करून आपल्या ग्राहकांना काही सांगायचे असेल तर त्या-त्या राज्यातील भाषेला प्रथम स्थान दिले पाहिजे. यामुळे व्यवसायवृद्धी, ग्राहकांचे समाधान या बाबी साध्य होतीलच आणि मायबोलीचा प्रवाह अधिक विस्तारायला आपलाही खारीचा हातभार लागेल हे निश्चित.  

© सदानंद कुलकर्णी 
[email protected]

Copyright 2021 All rights reserved