fbpx
Master Courses • Pure Learning

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय रे भाऊ?

डिजिटल मार्केटिंग, SEO  गाईडलाईन्स, सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन, पे पर क्लिक असे शब्द प्रथमच ऐकले की कोणाचीही छाती दडपून जाऊ शकते. डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही एखाद्या प्रोफेशनलकडे गेला तर तुमच्या गोंधळात अधिक भर पडू शकते. योग्य मार्गदर्शन आणि स्वतःचे नेमके प्रयत्न यांच्या आधारे हे तंत्र सहज आत्मसात करता येते. स्वतःची SEO फ्रेंडली वेबसाईट तयार करणे आणि स्वतःच्या बिझनेससाठी डिजिटल मार्केटिंग करणे यासाठी कोणतेही विशेष तांत्रिक ज्ञान आवश्यक नाही हे सर्वात महत्वाचे आहे.

कोणत्याही व्यवसायाच्या पाठीचा कणा म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे काय हे माहिती नसणारी अशिक्षित व्यक्ती सुद्धा सहजपणे सांगून जाते की ‘बोलणाऱ्याचे लोखंड विकले जाते, पण न बोलणाऱ्याच्या सोन्याकडे सुद्धा कोणी बघत नाही’ म्हणजेच एखादा विचार पटवून द्यायचा असेल, वस्तू विकायची असेल तर पद्धतशीर मार्केटिंग केले पाहिजे हे अगदी जुन्या जमान्यापासून आपले वाड-वडील सांगत आले आहेत पण वेगळ्या शब्दांत.

सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या युगात तर ज्याला प्रभावीपणे आपल्या उत्पादनांचे, सेवांचे मार्केटिंग करता येते त्यालाच बिझनेस करता येतो असे म्हणता येईल. मार्केटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रामध्ये गेल्या कित्येक वर्षांमध्ये फारसा बदल झालेला नव्हता. उद्योजक आपल्या उत्पादनांची जाहिरात त्याच-त्या पद्धतीने करत आले आहेत. त्यासाठी वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन, रेडीओ, प्रिंटेड मटेरीअल, होर्डिंग यांचा वापर वर्षानुवर्षे होत आलेला आहे. याला आउटबाउंड मार्केटिंग म्हणता येईल. म्हणजेच उद्योजक स्वतः बाहेर पडून ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी, त्याला पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत होते. ग्राहकराजा मात्र उद्योजकांनी केलेल्या जाहिरातीतून, त्याच्यापर्यंत अनायासे पोचलेल्या आणि बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांपैकी एखाद्याची निवड करून आपल्या गरजा भागवत असे.

इंटरनेट: व्यावसायिक आणि ग्राहक यांच्या भेटीचे नवीन ठिकाण

मागच्या काही वर्षात इंटरनेटचा प्रभाव जीवनातील प्रत्येक बाबीवर वाढतच गेला आहे. सध्या इंटरनेटचा वापर आणि त्यावर असलेले अवलंबित्व एवढे वाढले आहे की मानवी जीवनाच्या इतिहासात हजारो वर्षांपूर्वी लागलेला चाकाचा शोध आणि काही वर्षांपूर्वी लागलेला इंटरनेटचा शोध हे समान महत्वाचे शोध मानले जाऊ लागले आहेत. आज इंटरनेट आपल्या जीवनातून वजा केले तर ते जीवन कसे असेल याची कल्पनाही करवत नाही. माणसाच्या इंटरनेटवर अवलंबून असलेल्या आजच्या जीवनपद्धतीतूनच डिजिटल मार्केटिंगचा जन्म झाला आहे. डिजिटल मार्केटिंगला इनबाउंड मार्केटिंग असेही म्हणतात.

इनबाउंड मार्केटिंग मध्ये व्यावसायिक स्वतः ग्राहकाकडे जात नाही तर ग्राहकच त्याला आवश्यक असलेल्या वस्तू, सेवा इंटरनेटवर शोधतो, इंटरनेटच्याच माध्यमातून व्यावसायिकापर्यंत पोचतो आणि त्यातून खरेदी विक्री होते. ज्या प्रमाणे व्यावसायिकाला त्याची उत्पादने विकायची आहेत त्याच प्रमाणे करोडो ग्राहकांना ती विकत सुद्धा घ्यायची आहेत. वस्तू, सेवा शोधणारा ग्राहक आणि त्याच्या गरजांची पूर्तता करणारा उद्योजक यांची भेट घडवून आणणारे माध्यम म्हणजे इंटरनेट.

इंटरनेटवर ग्राहकांच्या नजरेस पडणे महत्वाचे आहे

पारंपरिक आउटबाउंड मार्केटिंग मध्ये व्यावसायिकाला ग्राहकापर्यंत पोचण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करावे लागतात. याच्या उलट इनबाउंड मार्केटिंग मध्ये मात्र ग्राहक स्वतःच त्याला हव्या असलेल्या वस्तू आणि सेवा यांचा शोध इंटरनेटवर घेत असतात. त्यामुळे ग्राहक जेंव्हा त्याला हवी असलेली उत्पादने आणि सेवा इंटरनेट वर शोधत असतात तेंव्हा तुमचा ब्रँन्ड, तुमची उत्पादने, तुमच्या सेवा ग्राहकाच्या नजरेस पडायला हव्यात. खरेदी करण्यासाठी तयार होऊन बसलेला असलेला हा गरजू ग्राहक त्यानंतर तुमच्या वेबसाईटवर येईल किंवा सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याला तुमच्याविषयी माहिती मिळेल. एकमेकांचा परिचय नसलेले ग्राहक आणि उद्योजक इंटरनेटच्या माध्यमातून परस्परांच्या संपर्कात येतील. व्यावसायिकाला मिळणाऱ्या बिझनेस मधला हा सर्वात महत्वाचा टप्पा त्याच्या नकळत पार पडतो. हा अनोळखी ग्राहक व्यावसायिकाच्या शहरातला असू शकतो, राज्यातला, देशातला असू शकतो किंवा अगदी परदेशातलाही असू शकतो.

हे काही आपोआप होणार नाही!

पण तुम्ही स्वतः काहीही प्रयत्न न करता संभाव्य ग्राहक तुमच्या वेबसाईटला कशी काय भेट देईल? तो काही आपोआप तुमच्या फेसबुक पेज वर जाणार नाही किंवा तुम्ही काहीही न करता संभाव्य ग्राहक तुमचा युट्युब व्हिडीओ पाहणार नाही. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला आपोआप बिझनेस कसा काय मिळेल? त्यासाठी तुम्हालाही काहीतरी करावे लागेलच. हे काहीतरी करणे म्हणजेच डिजिटल मार्केटिंग आहे. डिजिटल मार्केटिंग नेमके कशा पद्धतीने काम करते आणि पारंपारिक आउटबाउंड मार्केटिंगपेक्षा ते कसे वेगळे आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊ.

कल्पना करा की तुम्हाला मोबाईल फोन खरेदी करायचा आहे किंवा कॅमेरा खरेदी करायचा आहे, थंड हवेच्या ठिकाणी हॉटेल बुक करायचे आहे, तुमच्या भागातला चांगला डेंटिस्ट शोधायचा आहे, घर खरेदी करायचे आहे किंवा इंटेरिअर डिझायनर शोधायचा आहे, मुलांसाठी चांगला कोचिंग क्लास हवा आहे. कारण काहीही असो, आजकाल कोणी कोणाला व्यक्तीशः विचारत बसत नाही. लोक सरळ खिशातला मोबाईल फोन काढतात. फोन अखंड इंटरनेटशी जोडलेला असतोच. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी लोक गुगल सर्च इंजिन मध्ये शोधतात. हवी असलेली वस्तू आणि सेवा शोधण्यासाठी लोक वेगवेगळे कीवर्ड वापरतात, सर्च क्वेरीज वापरतात. सर्च रिझल्ट मध्ये दिसणाऱ्या साधारणतः पहिल्या किंवा दुसऱ्या पेजवरील पंधरा वीस वेबसाईट पहिल्या जातात. ज्या वेबसाईटवरील माहितीने समाधान होईल, प्रश्नांची उत्तरे मिळतील  त्यातल्याच एकासोबत व्यवहार केला जातो. आजच्या डिजिटल युगातले हे एक सर्वसामान्य चित्र आहे.

स्वतःला विचारा "मैं कहाँ हूँ?"

डिजिटल मार्केटिंगविषयीच्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की सर्च रिझल्ट मध्ये दाखवली जाणारी पहिली तीनच पेजेस पाहून निर्णय घेण्याचे प्रमाण तब्बल पासष्ठ टक्के इतके आहे. म्हणजेच सर्च रिझल्ट मध्ये ज्यांच्या वेबसाईट पहिल्या तीन पेजेस मध्ये दाखवल्या जातात त्यांना ऑनलाईन माध्यमातून मोठा बिझनेस मिळत असणार हे उघड आहे. हे व्यावसायिक विविध वस्तूंचे नामवंत उत्पादक, विक्रेते असतील किंवा फोटोग्राफर, ब्युटिशिअन, हॉटेल व्यावसायिक या सारखे एकेकट्याने स्थानिक पातळीवर व्यवसाय करणारे असतील. त्यामुळे सर्च रिझल्टमध्ये कमीत कमी पहिल्या तीन पेजेस मध्येतरी आपली वेबसाईट दिसायला हवी हे आपले ध्येय असायला हवे. पण त्या आधी “मैं कहाँ हूँ?” असा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. त्यासाठी व्यवसायासाठी महत्वाच्या असलेल्या किवर्डसने शोधल्यानंतर आपली वेबसाईट कोणत्या पेजवर कुठे दिसते आहे हे प्रथम पाहणे आवश्यक आहे. सध्या आपण कुठे आहोत हे समजल्यानंतर आपल्याला किती मजल मारायची आहे याचे चित्र स्पष्ट होईल आणि त्याप्रमाणे डिजिटल मार्केटिंगची रणनीती आखता येईल.

डिजिटल मार्केटिंग: पेड की फ्री?

आपण जेंव्हा आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीचा इंटरनेटवर शोध घेतो तेंव्हा आपल्या समोर एकाच वेळी जाहिराती आणि ऑरगॅनिक सर्च रिझल्ट दिसत असतात. जाहिरातींच्या सुरुवातीला Ad असे लिहिलेले असते. यानंतर दाखवले जातात ऑरगॅनिक सर्च रिझल्टस. याला SEO रिझल्ट असेही म्हणतात. यासाठी मात्र एक पैसा कोणाला द्यावा लागत नाही. म्हणजेच सर्च रिझल्ट मध्ये आपली वेबसाईट चांगल्या पोजिशनला दाखवण्यासाठी दोन मार्ग आपल्यासमोर आहेत. फ्री असलेले सर्च इंजिन ऑप्टीमायजेशन (SEO) आणि पैसे देऊन केलेले सर्च इंजिन मार्केटिंग (SEM).

SEO अर्थात ऑरगॅनिक सर्च रिझल्टच्या माध्यमातून वेबसाईट सर्च रिझल्ट मध्ये चांगल्या पोजिशनला आणण्यासाठी भरपूर, दीर्घकाळ मेहनत घ्यावी लागते. डिजिटल मार्केटिंगमध्ये SEO चे स्थान सर्वात महत्वाचे आहे कारण त्यातून मिळणारा रिझल्ट हा पूर्णपणे मोफत असतो. म्हणून प्रत्येक व्यावसायिकाने आपली वेबसाईट पहिल्या पेजवर, पहिल्या पोजिशनला दिसावी यासाठी सर्वात प्रथम SEO तंत्राचा वापर करायला हवा.

डिजिटल मार्केटिंग ही अनेक कौशल्यांची कसोटी आहे.

डिजिटल मार्केटिंगच्या कार्यपद्धतीची ओळख नसलेल्या काहींना हा प्रकार म्हणजे काहीतरी बनवाबनवी किंवा हातचलाखी आहे की काय असे वाटू शकते, मात्र डिजिटल मार्केटिंग हा योजनाबद्ध मेहनत प्रामाणिकपणे करण्याचा विषय आहे. यात तुमच्या उत्पादनांचा दर्जा, मानवी स्वभाव आणि संभाव्य ग्राहकाचे इंटरनेट वरील वर्तन जाणून घेण्याचे कसब, व्यावसायिक व्यूहरचना आखण्याची तुमची रणनीती आणि मेहनतीचे फळ मिळण्यासाठी धरावा लागणारा संयम अशा अनेक बाबी पणाला लावाव्या लागतात.     

SEO अर्थात सर्च इंजिन ऑप्टीमायजेशन दोन पद्धतीनी केले जाते. ऑन पेज ऑप्टीमायजेशन आणि ऑफ पेज ऑप्टीमायजेशन. ऑन पेज ऑप्टीमायजेशन हे वेबपेज तयार करतानाच केले जाते. यासाठी वेबपेज तयार करण्यासाठी विविध सर्च इंजिन्स आणि इंटरनेट विश्वात काम करणाऱ्या विविध संस्थांनी घालून दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करावे लागते. वेबपेजची URL, टायटल कसे असावे, वेबपेज मध्ये वेगवेगळ्या हेडिंग्जचा वापर कसा असायला हवा, पेजचे मेटा डिस्क्रिप्शन कसे असावे, पेज मधील कॉन्टेन्टमध्ये कीवर्ड्सचा वापर कसा असायला हवा, इमेजेसना alt tags कसे द्यावेत, पेजेस कशी लिंक करावीत अशा अनेक तांत्रिक बाबींचा समावेश या गाईडलाईन्स मध्ये असतो. याच बरोबर वेबसाईटचा लोडिंग स्पीड, रिस्पॉन्सिव्ह डिझाईन, वेबसाईट युजरची सिक्युरिटी या बाबीसुद्धा ऑन पेज ऑप्टीमायजेशनमध्ये महत्वाच्या ठरतात. ऑन पेज ऑप्टीमायजेशन ही वेबसाईट  डिझायनिंग करतानाच आणि साधारणपणे एकदाच करायची बाब आहे. ती आपल्या हातातील तांत्रिक बाब आहे त्यामुळे ऑन पेज ऑप्टीमायजेशनच्या गाईडलाईन्सचे जास्तीत जास्त पालन करावे म्हणजे SEO ची अर्धी बाजी घरबसल्या जिंकता येते.

ऑफ पेज ऑप्टीमायजेशन, एक निरंतर प्रक्रिया

ऑन पेज ऑप्टीमायजेशन ही तांत्रिक बाबींची पूर्तता आहे, ती तुम्हीच करायची आहे तर ऑफ पेज ऑप्टीमायजेशन तुमच्या वेबसाईटला भेट देणाऱ्यांनी, त्यांच्या नकळत करत असतात. तुमच्या वेबसाईट वर येणारे व्हिजिटर वेबसाईटवर किती वेळ थांबतात? ते वारंवार वेबसाईटला भेट देतात का? वेबसाईट मध्ये त्यांची एंगेजमेंट कशी होते आहे? ते वेबसाईट किंवा वेबपेज इतरांना शेअर करतात का? वेबसाईट सोबत लिंक केलेल्या तुमच्या सोशल मिडिया चॅनल्सवर काय घडामोडी घडत आहेत? लोक त्याला कसा प्रतिसाद देत आहेत? अशा अनेक बाबींवर ऑफ पेज ऑप्टीमायजेशनचा स्कोअर अवलंबून असतो. थोडक्यात ऑफ पेज ऑप्टिमायजेशन हे वेबसाईट ला भेट देणारे, सोशल मीडिया वरचे तुमचे फॉलोअर्स करत असतात. काही काळापूर्वी एखादी वेबसाईट किती आणि कुठे शेअर केली गेली आहे हा सर्वात महत्वाचा निकष ऑफ पेज ऑप्टीमायजेशन मध्ये मानला जात असे. याला बॅक लिंक्स असे म्हणतात. मात्र यामुळे लिंक बिल्डींग सारखे गैरप्रकार सुरु झाले होते. त्यामुळे  गुगल सारख्या प्रमुख सर्च इंजिनच्या दृष्टीने आता युजर एंगेजमेंट हा सर्वात महत्वाचा निकष आहे. लोकांना तुम्ही प्रयत्नपूर्वक वेबसाईटवर पाठवू शकता, पण त्यांची वेबसाईटसोबतची  एंगेजमेंट वाढवणे हे सर्वात महत्वाचे आहे. यासाठी वेबसाईट युजरला खिळवून ठेवणारा दर्जेदार कॉन्टेन्ट असणे आता आवश्यक झाले आहे.

युजर एन्गेजमेंट कशी वाढवु?

युजर एंगेजमेंट हे डिजिटल मार्केटिंग मधले आजचे चलनी नाणे आहे.  गुगल सारखे आघाडीचे सर्च इंजिन युजर एंगेजमेंटला प्राधान्यक्रम देत आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग विषयी बोलताना मी युजर एंगेजमेंट वाढवा असे सांगतो तेंव्हा बरेच व्यावसायिक यासाठी मी काय करू असे विचारतात. युजर एंगेजमेंट वाढवण्यासाठी ‘नॉलेज शेअरिंग’ हा सर्वोत्तम मार्ग आहे. आपले सर्व व्यवसाय हे माणसांसाठी, माणसांनी चालवलेले आहेत. प्रत्येकाच्या व्यवसायात काहीना-काही सांगण्यासारखे जरूर असते. तुमच्याकडे सांगण्यासारखे जे काही आहे ते मांडण्यासाठी तुमच्या वेबसाईटइतके उत्तम आणि हक्काचे व्यासपीठ दुसरे कोणतेच नाही. तुमच्या वेबसाईटमध्ये तुम्ही ब्लॉग सारखा एखादा विभाग सुरु करून तिथे नियमित अंतराने काही आर्टिकल्स तुम्ही लिहू शकता. तुम्ही ब्युटिशियन असाल तर वेगवेगळ्या ऋतूंमध्ये सौंदर्याची निगा कशी राखायची याच्या टिप्स देणारी आर्टिकल्स तुम्ही लिहू शकता. तुम्ही इलेक्ट्रीशिअन असाल तर घरगुती उपकरणांचा सुरक्षित वापर कसा करायचा, त्यांची निगा कशी राखायची हे तुम्ही लिहू शकता. तुम्ही करत असलेल्या व्यवसायाची कोणती माहिती लोकांना आवडू शकते याचा शोध तुम्हालाच घ्यायचा आहे. वेबसाईटवर आर्टिकल लिहा आणि तुमच्या सोशल मीडियावर त्याची लिंक पब्लिश करा. उपयुक्त माहिती असलेल्या पोस्ट लोक वाचतात, आवर्जून शेअर करतात. त्यातून वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या वाढेल, युजर एंगेजमेंट वाढेल. त्याचा फायदा सर्च रिझल्ट मधील वेबसाईटची पोजिशन वाढण्यासाठी होईल.       

ऑन पेज आणि ऑफ पेज, दोन्ही आघाड्या तुम्हालाच सांभाळायच्या आहेत.

तुम्ही SEO च्या तांत्रिक गाईडलाईन्सचे पालन केलेले असेल आणि तुमच्या वेबसाईट मधला कॉन्टेन्ट दर्जेदार असेल, वेबसाईट व्हिजिटर्सना तो आवडत असेल, ते वेबसाईटवर बराच काळ थांबत असतील, पुन्हा पुन्हा वेबसाईटवर येत असतील, तुमचे वेबपेज तुमचे युजर्स सोशल मिडिया, इमेल्स, मेसेजिंग अँप्स वर शेअर करत असतील तर गुगल किंवा इतर सर्च इंजिन्स याची नक्की दखल घेतात. SEO गाईडलाईन्सचे पालन, क्वालिटी कॉन्टेन्ट आणि युजर एन्गेजमेन्ट अशा तिन्ही आघाड्यांवर तुमची वेबसाईट उत्तीर्ण होत असेल तर तुम्ही ठरवलेल्या कीवर्डने कोणी इंटरनेटवर सर्च केले तर तुमची वेबसाईट सर्च इंजिन मध्ये प्राधान्याने दाखवली जाईल. 

ऑन पेज ऑप्टीमायजेशनच्या टेक्निकल गाईडलाईन्स या निश्चित ठरलेल्या आहेत. त्यांचे पालन एकदाच वेबपेज तयार करताना करायचे आहे मात्र ऑफ पेज ऑप्टीमायजेशन ही युजर यंगेजमेंट आणि सोशल शेअरिंगची निरंतर सुरु असलेली एक सामाजिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया सतत सुरु राहावी यासाठी दर्जेदार मजकूर लिहिणे, वेबसाईट व्हिजिटरच्या दृष्टीने उपयुक्त महिती देणे, युजरला वेबसाईटला वारंवार व्हिजिट द्यायला उद्युक्त करणे, वेबसाईट शेअर करण्यास प्रोत्साहन देणे या बाबी मात्र आपल्या हातात आहेत. ऑन पेज ऑप्टीमायजेशन आणि ऑफ पेज ऑप्टीमायजेशन ही डिजिटल मार्केटिंगची दोन प्रमुख चाके आहेत आणि त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रण तुमच्या हातात आहे. ज्यांना या दोन्ही आघाड्या व्यवस्थित सांभाळता येतात त्यांना एक रुपया खर्च न करता आपली वेबसाईट सर्च रिझल्ट मध्ये चांगल्या पोजिशनला दाखवता येईल. त्यातून परस्पर बिझनेस मिळत जाईल आणि बिझनेस वाढत जाईल.

मात्र अशा पद्धतीने SEO चा वापर करून ऑरगॅनिक सर्च रिझल्टमध्ये वेबसाईट पहिल्या काही पेजेस वर येण्यासाठी काही महिने ते काही वर्षे लागू शकतात, मात्र हे यश दीर्घकाळ टिकणारे असते. तुम्ही वापरत असलेल्या किवर्ड्सना स्पर्धक वेबसाइट्स किती आहेत, त्यांचा SEO स्कोअर कसा आहे यावर हा कालावधी अवलंबून आहे. कोणते वेबपेज कोणत्या निकषांच्या आधारे ऑरगॅनिक सर्च रिझल्टमध्ये दाखवले जात आहे याची माहिती सर्च इंजिन कधीही उघड करत नाहीत. सर्च इंजिन त्यांचे रँकिंग निकष वरचे वर बदलत असतात किंवा अपडेट करत असतात. मात्र ऑन पेज ऑप्टीमायजेशन आणि ऑफ पेज ऑप्टीमायजेशन हे दोन निकष मात्र सदैव समान महत्वाचे आहेत, असतील आणि असणार आहेत. 

सर्च इंजिन मार्केटिंग: झटपट पेड रिझल्ट

ऑरगॅनिक सर्च रिझल्टमध्ये वेबसाईट चांगल्या पोजिशनला दाखवण्यासाठी बराच काळ द्यावा लागतो. मात्र नुकतीच पब्लिश केलेली तुमची वेबसाईट आजच पहिल्या पेजवर, पहिल्या पोजिशनला दाखवण्यासाठी सर्च इंजिन मार्केटिंगचा (SEM) आधार घेता येतो. डिजिटल मार्केटिंगचे हे दुसरे अंग आहे. SEM हे ‘पे पर क्लिक’ (PPC) या तत्वावर काम करते. अर्थात तुमच्या जाहिरातीवर कोणी क्लिक केले तरच त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतात. 

सर्च इंजिन मार्केटिंग करण्यासाठी गुगलने ‘गुगल ऍड्स‘ नावाचा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. (पूर्वीचे Adwords) आपली उत्पादने आणि सेवा इंटरनेट वर शोधताना ग्राहक कोणत्या किवर्डसचा वापर करतात हे गुगल ऍड्स मधील टूल्सच्या मदतीने शोधता येते. तुमच्या शहरातील, राज्यातील, देशातील किंवा जगभरातील ग्राहकांनी तुम्ही ठरवलेल्या किवर्डसचा वापर करून दरमहा किती वेळा सर्च केले गेले आहे हे ही गुगल ऍड्स मधून समजते. 

तुमची वेबसाइट सर्च रिझल्ट मध्ये दाखवण्यासाठी तुम्ही तुम्हाला परवडेल इतक्या रकमेची बोली (bid) लावू शकता. सर्च इंजिन मार्केटिंगवर एका दिवसात किती रुपये खर्च करायचे हे देखील तुम्हीच ठरवू शकता. तुमचे डेली बजेट, किवर्डवर लावलेली बोली, त्या किवर्डला असलेली कॉम्पिटिशन या सर्व निकषांच्या आधारे सर्च रिझल्ट मध्ये तुमची वेबसाईट कोणत्या पेजवर कोणत्या पोजिशनला दाखवायची हे ठरवले जाते. ज्याची बोली अधिक त्याचीच वेबसाईट पहिल्या पेजवर पहिल्या पोजिशनला दाखवली जाईलच असे नाही. बोलीच्या रकमेपेक्षा त्या ऍडला कसा प्रतिसाद मिळतो आहे, किती जण त्यावर क्लिक करत आहेत याच्या आधारे एखादी ऍड सर्च रिझल्ट मध्ये कोणत्या पोजिशनला दाखवायची ते ठरते. कल्पना करा की तुम्ही एका क्लिक साठी दोन रुपये ही बोली लावली आहे. तुम्ही तुमची जाहिरात आकर्षक आणि नेमकी माहिती देणारी आहे. तुमच्या स्पर्धकाने मात्र एका क्लिक साठी दहा रुपये बोली लावली आहे. सर्च इंजिन मध्ये तुम्ही आणि तुमच्या स्पर्धकाच्या प्रत्येकी १०० जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. यापैकी तुमच्या जाहिरातीवर दहा लोकांनी क्लिक केले आहे. प्रत्येकी दोन रुपये प्रमाणे तुमच्याकडून सर्च इंजिन ला वीस रुपये उत्पन्न मिळाले आहे. तुमच्या स्पर्धकाने दहा रुपये बोली लावली आहे पण त्याच्या जाहिरातीवर फक्त एकाने क्लिक केले आहे, यातून सर्च इंजिनला दहा रुपये उत्पन्न झाले आहे. त्यामुळे जरी तुमची बोली कमी असली तरी तुमच्याकडून सर्च इंजिनला अधिक उत्पन्न मिळत आहे, म्हणजे तुमची जाहिरात प्राधान्याने दाखवणे सर्च इंजिनसाठी तुलनेने अधिक फायद्याचे आहे. याला ढोबळ मानाने ‘क्वालिटी स्कोअर’ असे  म्हणतात. ज्याचा क्वालिटी स्कोअर चांगला असेल त्याची जाहिरात सर्च इंजिन मध्ये चांगल्या पोजिशनला दाखवली जाते. ज्याचा क्वालिटी स्कोअर चांगला असेल त्याला कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त लोकांना वेबसाईटवर नेता येते. चांगला क्वालिटी स्कोअर राखण्यासाठी जाहिरात सुद्धा आकर्षक, पाहणाऱ्याची नजर खेचून घेणारी असणे आवश्यक आहे. म्हणजेच पैसे देऊन केलेल्या जाहिरातींसाठी सुद्धा क्वालिटी कॉन्टेन्ट तयार करणे आवश्यक आहे.  

आउट बाउंड Vs इनबाउंड मार्केटिंग

पारंपरिक पद्धतीने आउटबाउंड मार्केटिंग मध्ये तुम्ही जेंव्हा जाहिरात करता, तेंव्हा ज्याच्या पर्यंत तुमची जाहिरात पोचते त्याला त्यावेळी तुमच्या उत्पादनांची गरज असेलच असे काही सांगता येत नाही. त्यामुळे एक हजार ग्राहकांपर्यंत तुमची जाहिरात पोचली असेल तर केवळ पाच दहा जण तुमच्या प्रॉडक्ट मध्ये लगेच स्वारस्य दाखवतील. पण जाहिरातीचे बजेट मात्र एक हजार जणांसाठीचे खर्च होते. सर्च इंजिन मार्केटिंग हे इनबाउंड मार्केटिंग आहे. यात जे ग्राहक तुमची उत्पादने आणि सेवा शोधत आहेत त्यांनाच तुमची जाहिरात दाखवली जाते. समजा एक हजार जणांना तुमची जाहिरात दाखवली गेली आणि त्यातील पंचवीस लोकांनी त्यावर क्लिक केले तर तुम्हाला फक्त या पंचवीस क्लिकचे पैसे मोजावे लागतील. दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्या वेळी संभाव्य हा ग्राहक खरेदी करण्यासाठी सर्च करत असतो. त्याला तुमची प्रॉडक्ट्स पसंद पडली तर लगेच खरेदीसुद्धा करू शकतो. म्हणजे ग्राहकाने शोध घेणे, त्याला तुमची वेबसाईट दिसणे आणि त्याने निर्णय घेऊन खरेदी करणे हि प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होऊ शकते. 

पारंपरिक आउटबाउंड मार्केटिंग मध्ये ग्राहकाला उत्पादनांची माहिती मिळणे आणि त्याने प्रत्यक्ष खरेदी करणे या प्रक्रियेत बराच वेळ जातो. मधल्या काळात ग्राहकाला आणखी काही पर्याय उपलब्ध झाले तर खरेदीचा निर्णय लांबणीवर पडेल कदाचित तो/ ती तुमचा ग्राहक होणार नाही. या सर्व बाबींचा विचार करता डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून झटपट, मोफत किंवा तुलनेने अगदी कमी खर्चात नेमकेपणाने ग्राहकापर्यंत पोचता येते आणि तेही तेंव्हा, जेंव्हा ग्राहक खरेदीसाठी तयार होऊन बसलेला असतो.

सर्च इंजिन मार्केटिंग प्रमाणेच फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, युट्युब, मोबाईल फोन मधील अँप्स अशा प्लॅटफॉर्मवरही जाहिराती करता येतात. तिथेही पे पर क्लिक (PPC) तत्वावर जाहिराती दाखवल्या जातात. मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येणारी व्यक्ती काहीतरी वस्तू किंवा सेवा शोधायला येत नसते. सोशल मीडिया ऍड्स या युजर इंटरेस्ट आणि युजर ऍक्टिव्हिटीच्या आधारे दाखवल्या जातात. त्यामुळे या ऍड्स ब्रँड अवेअरनेस साठी उपयुक्त मानल्या जातात.

हे सगळे मला कसे काय जमेल?

डिजिटल मार्केटिंग, SEO गाईडलाईन्स, सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन, पे पर क्लिक असे शब्द प्रथमच ऐकले की कोणाचीही छाती दडपून जाऊ शकते. डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही एखाद्या प्रोफेशनलकडे गेला तर तुमच्या गोंधळात अधिक भर पडू शकते. पण खरे सांगायचे तर इंटरनेट, डिजिटल टेक्नॉलॉजी आणि त्यावर आधारित सेवा या जास्तीत जास्त युजर फ्रेंडली करण्याचा प्रयत्न त्यांच्याशी संबंधित संस्थांकडून सतत सुरु असतो. आज आपण इंटरनेट आधारित अनेक सेवा सहजपणे वापरतो आहोत कारण त्यांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे कि अगदी सामान्य माणूस सुद्धा त्यांचा वापर सहजपणे करू शकेल. योग्य मार्गदर्शन, पुरेसा अभ्यास आणि स्वतःचे नेमके प्रयत्न यांच्या आधारे हे तंत्र सहज आत्मसात करता येते. स्वतःची SEO फ्रेंडली वेबसाईट तयार करणे आणि स्वतःच्या बिझनेससाठी डिजिटल मार्केटिंग करणे यासाठी कोणतेही विशेष तांत्रिक ज्ञान आवश्यक नाही हे सर्वात महत्वाचे आहे. 

डिजिटल मार्केटिंग केवळ विकसित देशांमध्येच चालू शकेल आणि भारतात यायला त्याला अवकाश आहे. वेळ येईल तेंव्हा पाहू, अशा पद्धतीने जर आजचा कोणी व्यावसायिक विचार करत असेल तर त्याने वेळीच सावधान व्हायला हवे. स्मार्ट फोन्स आणि कॉम्प्युटर यांचा वाढत वापर, वेगवान आणि स्वस्त इंटरनेटची सहज उपलब्धता यामुळे डिजिटल मार्केटिंग क्षेत्र वेगाने विस्तारत आहे. सध्याच्या कोविड आपत्तीच्या काळात तर ऑनलाईन व्यवहार, डिजिटल मार्केटिंग यांचे महत्व अधिक स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वेळ वाया न घालता, पोस्ट कोविड युगातला एक व्यावसायिक या नात्याने स्वतःची प्रोफेशनली डिझाईन केलेली वेबसाईट आणि त्याला डिजिटल मार्केटिंगची जोड दिली गेली तर व्यवसायवाढीसाठी चोवीस तास कामावर असलेला एक तत्पर सेल्स एक्झिक्यूटिव्ह तुमच्या सेवेत हजर होईल.


सदानंद कुलकर्णी 
[email protected]

Copyright 2021 All rights reserved