fbpx
Master Courses • Pure Learning

कॅमेरा कोणता घेऊ?

कॅनन, निकॉन की सोनी?

DSLR फोटोग्राफी विश्वात पहिले पाउल टाकणाऱ्या व्यक्तींना रात्रंदिवस छळणारा प्रश्न म्हणजे “मी कोणता कॅमेरा घेऊ? निकॉन की कॅनन?” आजकाल या स्पर्धेमध्ये आणखी एक भिडू सामील झालाय त्याचे नाव आहे सोनी. कॅमेरा ठरल्यानंतर त्याला जोडूनच पुढचा प्रश्न कमरेवर हात ठेऊन तयारच असतो, “कोणत्या लेन्सेस घेऊ?”

फोटोग्राफी विश्वात अनेक दशके विचारल्या जाणाऱ्या या यक्षप्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करू.

निकॉन आणि कॅनन ही फोटोग्राफी विश्वातील दोन दिग्गज नावे. त्यांचे आपापले चाहते जगभर आहेत. आपण त्यातील एखाद्याला सहज विचारले की “कॅमेरा कोणता घेऊ? कॅनन की निकॉन?” तरी त्यांची गाडी सुसाट पळू लागते इतके त्या-त्या ब्रॅन्डचे ते एकनिष्ठ चाहते असतात. पण त्यामुळे विचारणारी व्यक्ती मात्र आणखी गोंधळून जाते.

DSLR कॅमेरा आणि लेन्सेस खरेदी करण्यापूर्वी त्यांचा आणि स्वतःच्या गरजांचा व्यवस्थित अभ्यास करणे आवश्यक आहे. हा अभ्यास कोणकोणत्या मुद्द्यांवर आधारित असायला हवा याची चर्चा आपण इथे करणार आहोत. आपण एखादा ब्रॅन्ड किंवा कॅमेरा मॉडेल यांचा रिव्ह्यू इथे घेणार नाहीत तर कॅमेरा खरेदी करण्यापूर्वी काय गृहपाठ करायला हवा हे पाहणार आहोत. त्यानंतर मात्र तुम्ही कोणालाही न विचारता किंवा गोंधळून न जाता आपला पहिला DSLR कॅमेरा सहजपणे खरेदी करू शकाल याची खात्री आहे. तुम्ही निवडलेल्या ब्रॅन्ड चा कॅमेरा एकदा खरेदी केला की तुम्ही सुद्धा त्या एकनिष्ठ चाहत्यांच्या सेनेत सामील व्हाल. कारण स्पष्ट आहे, या कंपन्या जागतिक स्तरावरील अव्वल, नामांकित आहेत. तुमच्या बजेट मध्ये बसणारे त्यांचे कोणतेही उत्पादन तुम्ही डोळे झाकून खरेदी केले तरी तुम्ही संतुष्ट व्हाल.

DSLR कॅमेरा खरेदी करण्याचा तुमचा उद्देश काय आहे?

● फोटोग्राफी व्यवसायासाठी? लग्न समारंभाचे फोटो काढण्यासाठी? स्टुडिओ फोटोग्राफी साठी? 

● आउटडोअर, स्पोर्ट, ऍडव्हेन्चर फोटोग्राफी साठी?  

● स्वतःच्या फोटोग्राफी छंदासाठी? वैयक्तिक, घरगुती वापरासाठी?

● सिनेमासारखा लुक असलेल्या शॉर्टफिल्म्स, व्हिडीओ फिल्मस् तुम्हाला बनवायच्या आहेत का? 

कॅमेरा खरेदी करण्यामागचा तुमचा उद्देश्य एकदा स्पष्ट झाला की विचारांची दिशा ठरते.

बजेट किती आहे?

एन्ट्री लेव्हलचा DSLR कॅमेरा खरेदी करण्यासाठी साधारण चाळीस ते साठ हजार रुपयांचे बजेट तयार ठेवावे लागेल. व्यावसायिक DSLR कॅमेरांच्या किमती साधारण दीड लाख ते साडेचार लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. आपण या सेग्मेंट बद्दल बोलणार नाहीत कारण त्यांचा वापरकर्ता हा अनुभवी फोटोग्राफर असतो. त्याची गरज नक्की काय आहे आणि त्यासाठी काय खरेदी करायचे हे त्याला माहित असते. अडचण होते ती पहिला DSLR कॅमेरा खरेदी करताना.    

तुम्ही कॅमेरा कसा वापरणार आहात?

DSLR कॅमेरा मध्ये अनेक फिचर्स असतात. त्यांच्या सेटिंग्ज आवश्यकतेप्रमाणे बदलता येतात. या सेटिंग्ज करून तुम्ही पूर्णपणे मॅन्यूअल मोड मध्ये फोटोग्राफी करू शकता, काही सेटिंग स्वतः कॅमेराला करायला देऊन सेमी ऑटो मोड मध्ये तसेच पूर्ण ऑटो मोड मध्येही फोटोग्राफी करू शकता. मॅन्यूअल मोड मध्ये प्रकाश आणि छाया यांचा क्रिएटिव वापर करून आर्ट फोटोग्राफी करता येते. मॅन्यूअल मोड मध्ये काम करण्यासाठी कॅमेरा आणि त्यामागील तंत्रज्ञान बारकाव्यानिशी समजून घेणे गरजेचे आहे. सेटिंग्जची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स वापरून फोटोमध्ये हवा असलेला परिणाम मिळवता येतो. फोटोग्राफरला कॅमेराचा वापर हा ब्रश, कलर्स आणि कॅनव्हास प्रमाणे करावा लागतो. त्यातूनच त्याची कलाकृती आकारास येते. फोटोग्राफी या उंचीवर नेण्यासाठी भरपूर वेळ, मेहनत, चिकाटी आणि कल्पनाशक्ती द्यावी लागते. हे शक्य असेल तरच DSLR कॅमेराची खरेदी सार्थकी लागेल.

DSLR कॅमेराने सेमी किंवा ऑटो मोड मध्ये फोटोग्राफी करणे आणि मोबाईल फोन किंवा कॉम्पॅक्ट कॅमेरावापरून फोटोग्राफी करणे यात तत्वतः काही फरक नाही.    

फोटोग्राफी व्यवसायासाठी कॅमेरा खरेदी करायचा आहे?

भारतात DSLR कॅमेरा खरेदी करणारा सर्वात मोठा वर्ग हा व्यावसायिक फोटोग्राफर मंडळींचा आहे. निकॉन, कॅनन या सारख्या कंपन्या त्यांची भारतासाठीची धोरणे हाच वर्ग डोळ्यासमोर ठेऊन आखतात.

फोटोग्राफी व्यावसायिकांसाठी सर्वात मोठ्या ऑर्डर्स या साधारणपणे वेडिंग फोटोग्राफीच्या असतात. लग्नसमारंभात उत्साहाने ओसंडून वाहणारे चेहरे, ठेवणीतील रंगीबेरंगी कपडे, साड्या, दागदागिने, पूजाविधी यातून रंगांची अक्षरशः मुक्त उधळण सुरु असते. विविधरंगी सोहळे कॅमेराने टिपून त्यांची स्मृती उत्तम प्रकारे जतन करण्यासाठी फोटोग्राफर पूर्णपणे कॅमेरा आणि फोटोप्रिंटींग यांच्यावर विसंबून असतो. असे म्हटले जाते की कॅनन कॅमेराने काढलेल्या फोटोज मध्ये कुल टोन (cool tone) प्रभावी असतो तर निकॉन कॅमेरे छायाचित्रांना वार्म टोन (warm tone) देतात. असेही म्हटले जाते की कॅनन कॅमेरे फोटोज मध्ये वास्तवदर्शी रंग देतात,

 स्कीन टोन्स सुद्धा वास्तव मिळतात. तर निकॉन कॅमेरे रंगांना अधिक उजळ, चमकदार बनवतात. त्यात लाल, पिवळे हिरवे रंग अधिक उठावदार दिसतात. त्यांच्या रंगांमध्ये अधिक विरोधाभास (contrast) असतो. कॅनन च्या तुलनेत निकॉन लेन्सेस अधिक शार्प इमेजेस देतात. भारतीयांना उजळ, उठावदार रंगसंगती अधिक भावते म्हणून बहुतेक व्यावसायिक फोटोग्राफर्स निकॉन कॅमेराना पसंदी देत असावेत.

पाश्चिमात्य देशांमधील विवाहात पांढऱ्या, करड्या (ग्रे) आणि काळ्या रंगाचे प्राबल्य असते. कॅनन असे रंग व्यवस्थित हाताळतो. एकूणच तिथल्या समाजजीवनात आणि निसर्गातही सात आठ महिने याच रंगांच्या छटा दिसतात. म्हणून कदाचित तिकडे कॅनन कॅमेरे अधिक वापरले जात असावेत. एखादा ब्रॅन्ड एका देशात अधिक का पसंद केला जातो याची करणे बऱ्याचदा स्थानिक घटकांशी संबंधित असतात.

भारतातले बहुसंख्य फोटोग्राफर्स एकेकटे स्वतंत्र व्यवसाय करतात. पण काही वेळा मोठ्या ऑर्डरसाठी हेच फोटोग्राफर त्या कामापुरते एकत्र काम करतात. अशावेळी ग्रुप मधील सर्वाकडे एकाच कंपनीचा कॅमेरा असणे केंव्हाही फायदेशीर असते. यामुळे सर्वांच्या कॅमेरामध्ये काही सेटिंग समान ठेवल्या तर सर्वांच्या फोटोमधील कलर्स मध्ये सारखेपणा दिसेल. अडचणीच्या वेळी एकमेकांच्या लेन्सेस, बॅटरीज आणि चार्जर्स शेअर करता येतील. मेमरी कार्ड्स सुद्धा फॉर्मेट न करता वापरता येतील. या बाबी वरवर पाहता किरकोळ वाटतील पण आणीबाणीच्या प्रसंगी फोटोग्राफरला जीवनदान देणाऱ्या ठरतात. त्यासाठी आपल्या आसपासचे फोटोग्राफर कोणत्या कंपनीचे कॅमेरे वापरतात याकडे लक्ष असावे.

पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात स्पेशल लेन्सेस आणि इतर फोटोग्राफी साहित्य भाड्याने मिळते. याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुमच्या जवळच्या एजन्सीकडे कोणत्या कंपनीच्या लेन्सेस अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत हे पाहता येईल. 

DSLR कॅमेराचे बजेट जसजसे वाढत जाते तसतसे लोकांचा कल कॅनन कढे वाढत जातो हे जगभरातील निरीक्षण आहे. फॅशन फोटोग्राफी, आर्किटेक्चरल फोटोग्राफी, वाइल्ड लाइफ फोटोग्राफी यामध्ये कॅननचा वरचष्मा आहे. प्रोफेशनल सेग्मेंट मधील Canon 5D हा फुल फ्रेम कॅमेरा जगात सर्वाधिक विकला जातो. त्याची चौथी आवृत्ती सध्या बाजारात उपलब्ध आहे. या सेग्मेंट मधील फोटोग्राफर्स कॅननला पसंदी देतात कारण कॅनन कडे लेन्सेसची प्रचंड व्हरायटी आहे. 8 MM ते 800 MM फोकल लेंग्थ असलेल्या, विविध कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या लेन्सेस कॅनन तयार करतो. 

कॅमेरा खरेदी करताना त्याची सर्विसिंग आणि आफ्टर सेल सर्व्हिस कुठे आणि कशी मिळेल हे ही पाहणे गरजेचे आहे. तुम्ही एखाद्या लहान गावात व्यवसाय करीत असाल आणि सर्व्हिसिंग साठी खूप दूर जावे लागत असेल तर वेळ आणि पैसे दोन्हींचा अपव्यय होईल.

कमर्शिअल आणि वेडिंग फोटोग्राफर मंडळीना घाई आणि गर्दीमध्ये फोटोग्राफी करावी लागते. अशावेळी वारंवार लेन्सेस बदलता येत नाहीत म्हणून कॅमेरा बॉडी वेगळी आणि बजेटनुसार 18-105, 18-135, 18-200 या पैकी कोणतीही लेन्स खरेदी करावी. या लेन्सेस मुळे लेन्स न बदलता वाईड आणि टेली मोड मध्ये काम करता येते. कॉन्स्टंट अपर्चर असलेल्या Canon 24-105 mm, Nikon AF-S 70-200 mm सारख्या काही लेन्सेस सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत 

आउटडोअर, स्पोर्ट, ऍडव्हेन्चर फोटोग्राफी साठी कॅमेरा खरेदी करायचा आहे?

या कामासाठी कॅमेरा खरेदी करताना कॅमेराचा बर्स्ट स्पीड आणि क्विक फोकस करण्याची क्षमता या बाबी सर्वात महत्वाच्या आहेत. जलद गतीने धावणारा खेळाडू, सुसाट पळणारी स्पोर्ट्स कार किंवा बाईक अथवा वेगाने दौडत निघालेले हरीण यांचे फोटोज ‘एकावेळी एक फोटो’ या नेहमीच्या पद्धतीने काढले जात नाहीत तर एकदा शटर बटन दाबल्यानंतर एका सेकंदामध्ये कॅमेराला शक्य असतील तितके फोटो सलग काढले जातात. कॅमेरा एका सेकंदामध्ये सलग किती फोटो काढू शकतो (fremes per second) याला बर्स्ट स्पीड असे म्हणतात. बर्स्ट स्पीड जितकी जास्त तेवढा तो कॅमेरा स्पोर्ट, ऍडव्हेन्चर फोटोग्राफी साठी आदर्श समाजाला जातो.

बर्स्ट स्पीड बरोबरच अत्यंत जलद गतीने फोकस करण्याची कॅमेरा आणि लेन्सेस यांची क्षमता हे ही महत्वाचे आहे. सध्या सोनीचे A सिरीज मधील कॅमेरे सर्वोत्कृष्ठ बर्स्ट स्पीड आणि क्विक फोकसिंग यासाठी ओळखले जात आहेत.  

फोटोग्राफी छंदासाठी, वैयक्तिक घरगुती वापरासाठी कॅमेरा खरेदी करायचा आहे?

स्वतःच्या फोटोग्राफी छंदासाठी DSLR कॅमेरा घेणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. DSLR कॅमेरा खरेदी करताना सर्वात जास्त गोंधळलेली किंवा फारसा विचार न करता कॅमेरा घेणारी बहुसंख्य मंडळी याच वर्गात असतात.

वैयक्तिक वापरासाठी DSLR कॅमेरा घेताना निकॉन की कॅनन या वादामध्ये न पडलेलेच बरे. हे दोन्ही ब्रॅन्डस् जगातील सर्वोत्कृष्ट आहेत. कॅमेरा खरेदी करताना सर्वप्रथम हे पाहायला हवे की तुम्ही ठरवलेल्या बजेट मध्ये कोणती कंपनी सर्वोत्कृष्ट ऑफर देते आहे. कॅनन, निकॉन, सोनी किंवा कोणत्याही कंपनीच्या एन्ट्री लेव्हल DSLR कॅमेरा मध्ये APS-C प्रकारचा सेन्सर लावलेला असतो. त्यांची ISO रेंज, मेगापिक्सल, बर्स्ट स्पीड या बाबी जवळपास सारख्याच असतात. मेगापिक्सल अधिक तितका तो चांगला कॅमेरा हा गैरसमजही मनातून काढून टाकावा.

वैयक्तिक वापरासाठी कॅमेरा घेताना निकॉन की कॅनन? या वादात न पडलेले बरे! 

बहुतेक सर्वच कंपन्या एन्ट्री लेव्हल DSLR सोबत 18-55 फोकल लेन्थ असलेली कीट लेन्स देतात. आजकाल या कीट लेन्स सोबत 55-200, 55-250 किंवा 70-300 फोकल लेन्थ असलेल्या लेन्सेस सुद्धा बंडल्ड ऑफर म्हणून दिल्या जात आहेत. एरव्ही या लेन्सेस वेगळ्या घ्यायच्या म्हटल्या तर खूप महाग असतात. त्या कॅमेरा सोबत बंडल्ड ऑफर म्हणून मिळत असतील तर अवश्य घ्याव्यात. कॅमेरा घेताना कोणती कंपनी अधिक चांगली ऑफर देत आहे याकडे लक्ष ठेवावे. दिवाळी, गणेशोत्सव, दसरा अशा सणासुदीच्या काळात अशा ऑफर चांगल्या मिळतात. सध्या फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या ऑनलाईन मार्केटिंग कंपन्या सुद्धा मेगासेल च्या नावाखाली वर्षातून काही वेळा अशा ऑफर देतात. 

18-55 आणि 55-250 अशा बंडल्ड लेन्सेस सोबत 6 ते 8 हजार रुपयांना मिळणारी 50MM/1.8 ही सर्वात स्वस्त पोर्ट्रेट लेन्स विकत घेतली तर  तुमच्याकडे वाईड, झूम आणि पोर्ट्रेट अशा तिन्ही लेन्स असतील. 50MM/1.8 या प्राईम लेन्स मुळे शॅलो डेप्थ ऑफ फिल्डचा कलात्मक वापर करून तुमच्या फोटोग्राफीला आर्ट फोटोग्राफी मध्ये रुपांतरीत करता येईल.

काही वर्षांनी कॅमेरा जुना झाला म्हणून बदलायचा असेल तर त्यावेळी फक्त कॅमेरा बॉडी नवीन घेता येईल. लेन्सेस आहे त्याच वापरता येतील. त्यासाठी लेन्सेसची हाताळणी आणि सर्विसिंग योग्य पद्धतीने करावे लागेल. दमट हवामानात लेन्सेसच्या आत बुरशी तयार होण्याचे मोठे प्रमाण आहे. त्यासाठी लेन्सेस कोरड्या ठिकाणी सुरक्षित ठेवाव्या. लेन्सेस कपड्यांच्या, पुस्तकांच्या कपाटात ठेवल्या तर त्यातील कोंदट दमटपणा कॅमेरा आणि लेन्सेससाठी धोकादायक ठरू शकतो. वापरात नसताना लेन्सेस आणि कॅमेरा वेगवेगळा सीलबंद प्लास्टिकच्या पिशवीत ठेवावा. कॅमेरा बॅग मध्ये सिलिका जेलच्या लहान पाउच ठेवाव्यात. सिलिका जेल कॅमेरा बॅगमधील आर्द्रता शोषून घेतात आणि बॅगमध्ये कोरडेपणा राखण्यास मदत करतात. 

फोटोग्राफी स्टोअर मध्ये किंवा ऑनलाईन मार्केटप्लेसेसवर सिलिका जेलच्या 20 पाउचचे पॅक अगदी 100 ते 125 रुपयाना मिळते. पण त्यामुळे कॅमेरा आणि लेन्सेसचे मोठे संरक्षण होते.

शॅॅलो डेप्थ ऑफ फिल्ड मुळे बॅॅकग्राउंडचे ऑब्जेक्ट्स् डी फोकस होतात  

शॉर्टफिल्म्स बनवायच्या आहेत का? व्हीडीओ करणे हाच तुमचा प्राथमिक उद्देश्य आहे का?

फोटोग्राफी विश्वात ज्यांनी नुकतेच पदार्पण केले आहे त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की एक साधारण DSLR कॅमेरा व्यावसायिक व्हीडीओ कॅमेरापेक्षा चांगले व्हिडीओ चित्रीकरण करू शकतात. यात काही मर्यादा निश्चित आहेत पण त्या तांत्रिक आहेत. DSLR व्हीडीओ चा ‘लुक’ हा साधारण व्हीडीओ पेक्षा अतिशय वेगळा असतो. DSLR व्हिडीओ सीनेमा सारखे दिसतात. हा ‘सिनेमॅटिक लुक’ मिळविण्यासाठी कॅमेराची कलर प्रोफाईल, लेन्सेस, फ्रेम रेट आणि कलर ग्रेडिंग यांचा वापर सिनेमाच्या तंत्रासारखाच करावा लागतो. इंटर चेंजेबल लेन्सेसची मोठी व्हरायटी, शॅलो डेप्थ ऑफ़ फिल्ड, मोठा इमेज सेन्सर  आणि सहज तसेच तुलेनेने स्वस्त उपलब्धता इत्यादि बाबींमुळे DSLR कॅमेराचा वापर व्हिडीओ फिल्म्स / लो बजेट सिनेमा प्रॉडक्शनसाठी खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे तंत्रज्ञान आता नवीन वळणावर येऊन पोचले आहे. फोटोग्राफी आणि व्हिडीओ प्रोडक्शनच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन त्या एकाच कॅमेरात देणारे हायब्रीड DSLR आता बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत.

या क्रांतीची सुरुवात साधारण दहा वर्षांपूर्वी झाली. मार्केट मध्ये नुकताच दाखल झालेला Canon 7D हा कॅमेरा Full HD आणि सिनेमाच्या दर्जाचे व्हिडीओ चित्रित करू शकतो हे समजताच या क्षेत्रात खळबळ माजली. जगभरातील व्हिडीओ प्रोफेशनल्सच्या या कॅमेरावर उड्या पडू लागला. यात डिजिटल फिल्म मेकर्स, लो बजेट फिल्म मेकर्स, डॉक्युमेंटरी फिल्म मेकर्स, म्युझिक व्हिडीओ मेकर्स प्रामुख्याने होते. भारतातसुद्धा या कॅमेराने अल्पावधीत आपले बस्तान पक्के केले. 

सिनेमा तयार करण्यासाठी भारतात DSLR कॅमेराचा यशस्वी वापर करण्याचे श्रेय अमोल गोळे या मराठमोळ्या छायाचित्रकाराकडे जाते. त्याने या तंत्राने Canon 7D वापरून  स्टेनले का डिब्बा, एलिझाबेथ एकादशी हे पारितोषिक विजेते आणि इतर अनेक सिनेमे तयार केले. Canon 5D Mark-2 हा कॅमेरा तर बिगबजेट हॉलीवुड आणि बॉलीवुड सिनेमे तयार करण्यासाठी वापरला गेला. केवळ कॅनन DSLR कॅमेरामध्येच इंस्टाल केल्या जाऊ शकतील अशा Technicolor Cinestyle आणि Magic Lantern सारख्या फ्री युटिलिटीज सॉफ्टवेअर मुळे साधारण DSLR कॅमेरे हाय-एंड मुव्ही कॅमेरा सारखे वापरता येऊ लागले. Canon 5D आणि 7D या कॅमेरानी सात आठ वर्षे या क्षेत्रावर राज्य केले 

DSLR वापरून प्रोफेशनल, सिनेमॅॅटिक  व्हिडीओज तयार करण्याचे तंत्र आता चांगलेच प्रगत झाले आहे.

मागील तीन चार वर्षात मात्र चित्र बरेचसे बदलले आहे. अचानक सोनी कंपनीचे कॅमेरे या क्षेत्रात बाणासारखे घुसले. अल्पावधीतच त्यानी या सेग्मेंट मध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. सोनी चे A सिरीज मधील फुल फ्रेम आणि APSC सेन्सर असलेले कॅमेरे आज या क्षेत्रात धुमाकूळ घालत आहेत. उत्कृष्ट लो लाईट परफॉर्मन्स, कंटीन्यूअस ऑटो फोकस, इलेक्ट्रॉनिक व्ह्यु फाइंडर, 4K रेजोल्यूशन, उच्च दर्जाचा व्हिडीओ कोडेक (CODEC) ही आजच्या सोनी कॅमेराची वैशिष्ट्य आहेत.  

व्हिडीओ साठी DSLR खरेदी करताना तो 4K रेजोल्यूशन चे व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो की नाही ते जरूर पाहावे. आज फुल एच डी तंत्रज्ञान चरम अवस्थेला पोचले आहे. टीव्ही आणि कॅमेरे निर्माते वेगाने 4K तंत्रज्ञान लोकांपर्यंत घेऊन येत आहेत. पुढच्या दोन तीन वर्षात 4K व्हिडीओ तंत्रज्ञान चांगलेच स्थिरावलेले असेल. यामुळे आपण भविष्याचा वेध घेऊन आजच 4K तंत्रज्ञान आपलेसे केले तर स्पर्धेमध्ये आपणच पुढे असू. 

व्हिडीओसाठी DSLR खरेदी करताना त्याला मायक्रोफोन (माईक) लावता येतो का? हेडफोन लाऊन लाइव्ह ऑडीओ मॉनिटरिंग करता येते का हे ही पाहावे. ऑडीओ शिवाय व्हिडीओ अर्थहीन असतो त्यामुळे या सुविधा कॅमेरामध्ये असतील तर उत्तमच. नसतील तर वेगळा साउंड रेकॉर्डर खरेदी करता येईल. यासाठी Zoom H1 हा DSLR सोबत वापरण्यासाठी लोकप्रिय साउंड रेकॉर्डर आहे. भारतात अमेझॉनबजाओ यासारख्या ऑनलाइन मार्केट मध्ये 6 ते 8 हजार रुपयांना हा उपलब्ध आहे.   

पॅनासॉनिकचे GH सीरिज मधील कॅमेरे सुद्धा डिजिटल सिनेमा साठी वापरले जातात. विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये हे कॅमेरे व्हिडीओ फिल्म मेकिंग साठी खूप लोकप्रिय आहेत. यात APSC सेन्सर पेक्षाही लहान असलेला मायक्रो 4/3 साईजचा सेन्सर वापरला जातो. 

 

DSLR सेगमेंट मध्ये भारतात कॅनन आणि निकॉन हेच मुख्य धारेतील दोन ब्रॅन्ड आहेत. सोनी, पॅनासॉनिक, पेंटेक्स, ऑलीम्पस यांची भारतीय बाजारात उपस्थिती आहे, पण DSLR म्हटले की कॅनन आणि निकॉन ही दोनच नावे डोळ्यासमोर येतात.

जागतिक पातळीवरील चित्र पहिले तर असे दिसते की DSLR कॅमेरांच्या विक्रीमध्ये कॅनन निकॉनपेक्षा खूप पुढे आहे. जपानच्या BCN Ranking ने दिलेल्या आकडेवारीनुसार 2019 साली जपान मध्ये विकल्या गेलेल्या एकूण DSLR कॅमेरांपैकी 57.4 टक्के वाटा कॅननचा होता. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या निकॉनचा वाटा हा 39.3 टक्के होता. भारतात अशा प्रकारची आकडेवारी उपलब्ध नसल्याने भारतीय बाजाराची मानसिकता आकड्यांच्या आधारे सिध्द करता येत नाही. मात्र भारतातील फोटो स्टुडिओज, वेडिंग फोटोग्राफर्स निकॉन कॅमेराना पहिली पसंती देतात तर मिडल रेंज प्रोफेशनल फोटोग्राफी साठी कॅनन कॅमेरे जास्त वापरले जातात. तर लो बजेट फिल्म मेकिंग साठी सोनी कॅमेरे भारतात जास्त वापरले जातात हे सर्वसाधारण चित्र आहे.      

या चर्चेला विराम देण्यापूर्वी आपण लक्षात ठेवायले हवे की कॅनन, निकॉन, सोनी, पॅनासॉनिक या कॅमेरा विश्वातील दिग्गज कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या जपानच्या आहेत. त्यांचा दीर्घ आणि गौरवशाली इतिहास आहे. अनेक उत्कृष्ट उत्पादने त्यांनी जगाला दिली आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोणतीही कंपनी प्रतिस्पर्धी कंपनीच्या खूप पुढे किंवा खूप मागे असत नाहीत. मात्र एक कंपनी आपली उत्पादने मोठ्या प्रमाणात विकते यामागे विक्री कौशल्य, आफ्टर सेल सर्व्हिस, स्थानिक मार्केट मधील ट्रेंड अशी इतर अनेक कारणे असतात.

कॅमेराच्या बाबतीत बहुसंख्य फोटोग्राफर “घर की मुर्गी दाल बराबर” या मनस्थितीत अडकलेले असतात. माझ्यापेक्षा अमुककडे असलेला कॅमेरा जास्त चांगला आहे या भावनेने ते पछाडलेले असतात. या अवस्थेतून बाहेर पडणेच चांगले. माझ्या हातात विश्वप्रसिध्द कंपनीचे उत्पादन आहे. भले मग ते कॅनन, निकॉन किंवा सोनी असो, ते वापरून मी चांगलाच रिझल्ट देईन हा आत्मविश्वास अंगी बाणवला पाहिजे.

फोटोग्राफी व्यवसायासाठी वापरायची असो की छंदासाठी, फोटोग्राफीच्या क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींकडे लक्ष असू द्यावे. यासाठी ऑनलाइन फोरम्स मधील न्यूज, कॅमेरा रिव्ह्युज यांच्याकडे लक्ष असावे. त्यांच्या वेगवेगळ्या परिस्थिती मध्ये घेतलेल्या टेस्ट पाहा. एकाच कंपनीच्या दोन वेगवेगळ्या किंवा एका प्राईस सेग्मेंट मधील दोन वेगवेगळ्या मॉडेल्सची तुलना अनेक वेबसाईटस वर पाहता येते. यासाठी जगभर विश्वसनीय समजल्या जाणाऱ्या www.dpreview.com या वेबसाईटला नियमित भेट दिली तरी आपली माहिती अद्ययावत राहते. फेसबुक वर वेडिंग फोटोग्राफी, वाईल्ड लाइफ फोटोग्राफी, इंडस्ट्रियल फोटोग्राफी अशा वेगवेगळ्या विषयाचे शेकडो ग्रुप्स आहेत. हे ग्रुप जॉईन केल्यानंतर आपण अगदी स्थानिक मित्र जोडू शकता आणि जागतिक पातळीच्या फोटोग्राफर्सशी मैत्री करू शकता.   

DSLR कॅमेरा विकत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर या पद्धतीने होमवर्क केल्यास ठरलेल्या बजेट मध्ये सर्वोत्तम कॅमेरा निवडणे सोपे जाईल. शेवटी कॅमेरा हे एक उपकरण आहे. फोटोग्राफी तर तुम्हाला स्वतःलाच करायची आहे. जो कॅमेरा निवडला आहे त्याच्या क्षमतांचा पूर्ण वापर करता येईल यासाठी स्वतःला तयार करणे, कॅमेरा मागील डोळे आणि त्यामागे असलेले मन जास्तीत जास्त परिपक्व होत जातील या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

सदानंद कुलकर्णी 
[email protected]

Copyright 2021 All rights reserved